आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?
अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते
अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे
सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे
हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे
आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे
मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे
वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे
झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे
हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा